हिंदू पंचांगाप्रमाणे आपले नव-वर्ष हेमलंबीनाम संवत्सरातील श्री शालिवाहन शके १९४०, चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला सुरू होणार ! या वर्षातील पहिला सण “गुढीपाडवा” किंवा “वर्षप्रतिपदा”. साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक असलेला हा मंगल सण साजरा करण्यासाठी आम्ही आपल्या सर्वांना आमंत्रित करतो.
मांगल्य, शौर्य, शांती, सूख, समृद्धी यांचे प्रतिक असलेल्या गुढीचे पूजन/उभारणी व स्नेह-भोजन हे तर आहेतच पण एक विशेष व वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला मिळणार आहे.
लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात कवितेचं एक विशेष स्थान आहे. कविता उत्तम सादर केली की ती जास्त सुंदर पद्धतीने पोहचते, मनाला भिडते... आणि तशी ती जगभरातील रासिकांपर्यंत पोहचावी म्हणून “कवितेचं पान” ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली मधुराणी प्रभुलकर यांनी.
संतकवींपासून, बहिणाबाई, कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, इंदिरा संत, शांता शेळके असे ज्येष्ठ आणि संदीप खरे, सौमित्र, वैभव जोशी अशा आत्ताच्या कवींपर्यंत; त्याचबरोबर काही अपरिचित अशा कवी/कवयित्रींच्या प्रेम, निसर्ग, पाऊस, बालपण ह्यापासून ते अगदी जीवन, अध्यात्म अशा विविधांगी विषयांवरील कविता यात समाविष्ट आहेत. कलाकार त्यांच्या चर्चेतून, गप्पा विनोद, किस्से ह्यातून विषय उलगडत कार्यक्रम पुढे नेतात. कौशल इनामदार (गायक, संगीतकार, कवी व मराठी अभिमान गीताचे संगीतकार), शर्वरी जमेनिस (कथ्थक नृत्यांगना, अभिनेत्री) आणि मधुराणी प्रभुलकर (अभिनेत्री, गायिका, संगीतकार) 'नृत्य, गायन, अभिवाचन आणि अभिनय’ ह्या वेगवेगळ्या कला-माध्यमांतून सादर होणाऱा हा अनोखा आणि अभिजात कार्यक्रम आपल्याला मंत्रमुग्ध करेल याची आम्हांला खात्री आहे.
गुढी-पाडव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा -
शनिवार १७ मार्च रोजी तिकिटे उपलब्ध होणार नाहीत.
रविवार १८ मार्च २०१८ रोजी कार्यक्रमाच्या स्थळी तिकिट घेतल्यास:- सभासद: S$२५, पाहुणे: S$४०, ५ वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश
तेव्हां मंडळी, लवकरात लवकर तिकिटे काढून आपली नांवे नोदवा म्हणजे आम्हांलाही भोजन व इतर व्यवस्था छान योजनाबद्ध करण्यास सोयीचे होईल.
आणखी एक विनंती - कार्यक्रमाला आपल्या मराठमोळ्या पारंपारिक पोषाखात या. आपले फोटोग्राफर सज्ज आहेत !
सस्नेह, कार्यकारिणी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699