नमस्कार मैत्रिणींनो,
श्रावण महिना सुरु झाला की आपल्याकडे सणवारांची सुरुवात होते. राखी पौर्णिमा, नागपंचमी, मंगळागौर, हळदीकुंकू म्हणजे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण. त्या उत्साहात आणि आनंदात थोडी भर घालण्यासाठी 'श्रावणसरी' या मंगळागौरीचे खेळ आणि हळदी कुंकूंच्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले आहे.
मंगळागौर ही एक पारंपरिक सौभाग्यदात्री देवता मानली जाते. लग्नानंतर पुढे पाच किंवा सात वर्षे विवाहित मुली श्रावणातल्या मंगळावारी हे व्रत करतात. या व्रतात शिव आणि गणपती यांच्यासह गौरीची पूजा केली जाते. गौरी म्हणजे पार्वती. हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच. श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे.
एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी-परंपरांनी बंदिस्त होते. त्यामुळे मंगळागौरीसारखी व्रतवैकल्ये म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधाण यायचे. काळ बदलला असला तरी मंगळागौर जागवणे, नाच - खेळ, नटणे, मैत्रिणींना भेटणे - हसणे - खिदळणे याची मजा आजही तेवढीच आहे. लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर अजूनही तेवढीच दणक्यात साजरी केली जाते. तर मग एकत्र येऊन करु या ही धमाल?
मैत्रिणींनो, १८ ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा. तुमच्या नऊवारी साड्या, सुंदर पैठण्या नेसून झिम्मा, फुगडी, गोफ असे विविध खेळ खेळायला जरूर या. तुम्हाला खेळ खेळण्याची इच्छा असेल, पण खेळायचे कसे ते माहित नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात येतील. आणि हो या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे हा खास महिलांनी महिलांसाठी ठरवलेला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम धार्मिक नसून केवळ हौशी आहे. तेव्हा आपले मराठी पारंपारिक खेळ आवडणा-या सर्वांना याला येण्याचे अगत्य आमंत्रण आहे.
चला तर मग, खेळूया मंगळागौरीचे खेळ. मोठेपणाची झाल उतरवून परत करूया दंगा, मस्ती आणि धम्माल !
रविवार १८ ऑगस्ट २०१९ संध्याकाळी ५:०० - मंगळागौर आरती व पुजा संध्याकाळी ५:३० ते ८:०० - खेळ व जेवण केंट वेल फंक्शन हॉल कोल्ड स्टोरेज च्या वर १०१ क्लेमेंटी रोड, सिंगापूर १२९७८७
तिकीट दर - $१५ (मेंबर); $१७ (पाहुणे)
मर्यादित जागा ! लवकरात लवकर तिकिटे नोंदवून टाका www.mmsingapore.org वर !! सस्नेह, आपली कार्यकारिणी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
Established 1994 | UEN S94SS0093G20 Maxwell Road, #09-17, Maxwell House, S069113 Fax # : 63993699